मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी होणारी निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लसच्या प्रसाराची भीती असल्यामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. या निवडणुका रद्द करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारनेही निवडणूक आयोगाला पत्र दिले होते.
राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समितीमधील एकूण ८५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्ह्यात ही निवडणूक पार पडणार होती. मात्र राज्य शासनाने दिलेल्या पत्रानुसार कोरोनाची दुसरी लाट अद्याप कमी झालेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लसचा प्रसार होण्याची भीती असल्यामुळे या निवडणुका आहे त्या स्थितीत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१९ जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होणार होते. मात्र आता कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या निवडणुकांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.