मुंबई : प्रतिनिधी
खासदार प्रीतम मुंडे यांना भाजपने केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले नसल्यामुळे बीड, अहमदनगरसह राज्याच्या इतर भागातील समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यातील नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, उद्या (मंगळवारी) पंकजा मुंडे या आपल्या समर्थकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी पंकजा मुंडे यांनी अचानकपणे दिल्ली वारी करत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. एकूणच या सर्व घडामोडीनंतर मंगळवारी पंकजा मुंडे या आपल्या समर्थकांशी बोलून पुढील राजकीय प्रवासाबद्दल निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रीमंडळाच्या विस्तरानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. मात्र विक्रमी मताधिक्य मिळवत दुसऱ्यांदा खासदार झालेल्या प्रीतम मुंडे यांना संधी मिळण्यात काहीच गैर नव्हते असे सांगत त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.
मुंडे समर्थकांच्या राजीनामा सत्रामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आता पेच उभा राहिला आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर भाजपचे राज्यातील नेते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.