मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? असा सवाल विदयार्थी आणि पालकांकडून उपस्थित होत होता. याच पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ठरलेल्या वेळेतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहे. परीक्षांबाबत माध्यमातून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना विद्यार्थी आणि पालकांनी बळी पडू नये. परीक्षा ठरलेल्या तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोरोना काळात जे परीक्षेस बसू शकणार नाहीत, त्यांच्या पुन्हा पुरवणी परीक्षा घेण्यात येतील.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात आमची शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेला आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षा रद्द केल्या तर त्याचा निकालासोबतच पुढील प्रवेशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.