महाबळेश्वर : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत केवळ एका मताने झालेला पराभव आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातून काल साताऱ्यात गोंधळही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कालच्या या चर्चेनंतर पवार यांनी शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते, या एकाच वाक्यात त्यांच्या पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.
महाबळेश्वर येथे शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे यांचा पराभव का झाला याच्या खोलात मी जाणार नाही. मात्र शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते.
शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, जर कृषी कायदे मागे घेतल्याने नुकसान होत असेल तर केंद्राने ते मागे का घेतले ? कृषी हा विषय राज्याचा आहे. केंद्र सरकारने त्यावेळी सरकारसोबत चर्चा केली नाही. राज्य सरकारांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांबाबत धोरणे ठरवताना सदनामध्ये चर्चा होत नाही.
आगामी पाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद सरकारने हे कायदे मागे घेतले असल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी यावेळी केला.