मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात मुंबईतच घेण्याबाबत राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. डिसेंबर महिन्यातील २२ ते २८ तारखेदरम्यान हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता हे अधिवेशन मुंबईतच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
परंपरेनुसार महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबईत होणार आहे. यावर्षी २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. या संदर्भात विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, विधानपरिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याबद्दलचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.