मुंबई : प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. करचुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन फेटाळला आहे. करचुकवेगिरी प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल केल्याने डिफॉल्ट जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
डिफॉल्ट जामीन मिळावा, यासाठी देशमुख यांनी ४ जानेवारीला विशेष न्यायालयात अर्ज केला होता .कर चुकवेगिरी प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तब्बल ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.