नागपुर : प्रतिनिधी
आरक्षण बदल आणि कोरोनामुळे राज्यातील चार हजारहून अधिक शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत भरती प्रक्रिया राबवली जाते. परंतु भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी असून शासनाने ही प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षक भरतीसाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे सरकारविरोधात उमेदवार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. २०१७ मध्ये शिक्षक भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा होऊन चार झाली तरी अद्याप या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या काळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु आता ती विद्यमान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली असताना अजूनही भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
सप्टेंबर २०२१ मध्ये तब्बल २ हजार ६२ रिक्त पदांसाठी मुलाखतीसह शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर पोर्टलवर जाहीर करावी. त्याचबरोबर उमेदवारांसाठी विनामुलाखतीच्या रिक्त पदांची प्रवर्गनिहाय आणि विषयनिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी आणि कोणताही बदल न करता खासगी संस्थांसाठी शिक्षक भरतीदेखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी अशी मागणी आता उमेदवार करत आहेत. त्यावर आता सरकारच्या भूमिकेकडे या इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.