औरंगाबाद : प्रतिनिधी
भाजपचे अहमदनगरमधील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीहून खासगी विमानातून रेमडिसीव्हर इंजेक्शन आणल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे इंजेक्शन खरे होते की बोगस याबद्दलही शाश्वती नसताना बेकायदेशीरपणे वाटप केल्याने खासदार विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने याबाबत कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासगी विमानाने दिल्लीतून रेमडिसीव्हर इंजेक्शन आणून त्याचे अहमदनगर जिल्ह्यात वाटप केले होते. याबाबत अरुण कडू आणि अन्य तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडापीठामध्ये याचिका दाखल करत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाटलेले इंजेक्शन खरे होते की बोगस याची तपासणी झाली होती का..? त्यांना हे इंजेक्शन वाटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती का..? या बाबी याचिकेत नमूद केल्या आहेत.
या याचिकेची औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेत राज्य शासनाने याबद्दल योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी दिली. याबद्दल येत्या गुरुवारी दि. २९ एप्रिल रोजी राज्य शासनाने समर्पक उत्तर द्यावे असेही या आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता गनिमी काव्याने रेमडिसीव्हर इंजेक्शन आणणाऱ्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर काय कारवाई होणार याकडेच लक्ष लागले आहे.