
मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातून फरार झाल्यानंतर ललित पाटील चेन्नईत लपून बसला होता. पोलिसांची दहा पथके त्याचा शोध घेत होती. अखेर मुंबई पोलिसांच्या पथकाने रात्री त्याला अटक केली.
ड्रग्ज प्रकरणात अटक असलेला ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. या दरम्यान, त्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला होता. या दरम्यान, त्याचा भाऊ भुषण पाटील यालाही अटक केली होती. पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत ललित पाटील याचा ठावठिकाणा शोधून काढला.
काल रात्री ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली असून लवकरच त्याला पुण्यात आणले जाणार असून न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या प्रकरणातील अनेक बाबी उघड होणार आहेत. अनेक बड्या लोकांची नावे तपासात समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.