पैठण : प्रतिनिधी
भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची सध्या मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पैठणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळांच्या अनुदानावरून बोलताना हे वादग्रस्त विधान केले आहे. ‘जुन्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्या काळात सरकार अनुदान देत नव्हते. त्यामुळे त्यांनी शाळेसाठी लोकांकडे भीक मागितली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून जोरदार हल्ला चढवला आहे. एकीकडे राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला आहे.