Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : ‘सबसे कातील गौतमी पाटील’च्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; पोलिसांकडून गौतमीला सोलापूरमध्ये ‘नो एन्ट्री’

ह्याचा प्रसार करा

सोलापूर : प्रतिनिधी   

नृत्यांगना गौतमी पाटील ही सातत्यानं चर्चेत असते. तरुणांमध्ये तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच तिच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला  मिळतं. त्यामुळंच आता सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या लावणी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळामुळे आणि अतिरिक्त बंदोबस्तामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येतो. त्यातूनच तिला पोलिसांकडून ‘नो एन्ट्री’ म्हणत परवानगी नाकारण्यात आली आहे.

सोलापूरमधील एका दांडिया कार्यक्रमासाठी गौतमी पाटील येणार होती. त्यासाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. परंतू विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. नवरात्रोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असते. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाला बंदोबस्त देणे अशक्य असल्याचं पत्र पोलिसांनी दिले आहे.

गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवात पोलिसांना अतिरिक्त काम करावं लागतं. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. त्यातच गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की अतिउत्साही चाहत्यांची गर्दी आणि त्यातून होणारा गोंधळ या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे अशा सण-उत्सवांच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली जात आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात बार्शी आणि मंद्रूप येथे गौतमीच्या कार्यक्रमात चांगलाच राडा झाला होता. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता. त्यातच नवरात्रोत्सवात पुन्हा असा गोंधळ उडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत गौतमीला सोलापुरात ‘नो एन्ट्री’ म्हणत परवानगीच नाकारली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version