बारामती : प्रतिनिधी
एमआयडीसीकडून उद्योगांना दिलेल्या जवळपास ८० सेवांसाठी गेल्या सहा वर्षापासूनचा जीएसटी दंडव्याजासह भरण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांना मोठा आर्थिक झटका बसणार आहे. जीएसटी विभाग आणि एमआयडीसीमध्ये समन्वय नसल्यामुळे ही वेळ आली असून त्याची किंमत उद्योजकांना मोजावी लागत आहे. एमआयडीसीचा हा निर्णय अन्यायकारक असून जीएसटीबाबतचे परिपत्रक त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली आहे.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे यांना निवेदन दिले. एमआयडीसीकडून उद्योगांना जवळपास ८० प्रकारच्या सेवा पुरवण्यात येतात. यामध्ये बांधकाम परवानगी, भूखंड हस्तांतरण, नवीन भूखंड विक्री व्यवहार, पोटभडेकरूसाठी परवानगी, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र, विकास शुल्क, भूखंडाचा वापर बदलणेची परवानगी, कंपनीच्या नावात बदल करणे, अग्निशमन सेवा, नवीन नळ जोडणी आदी सेवांचा समावेश आहे. उद्योगांनी या सेवा घेताना त्या त्या वेळेस एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे शुल्क भरलेले आहेत. आता एमआयडीसीने १ जुलै २०१७ ते ४ सप्टेंबर २०२२ या पाठीमागील सहा वर्षापासूनच्या कालावधीत भरलेल्या शुल्कावर दंड व्याजासह जीएसटी भरण्याचे आदेश काढले आहेत.
एमआयडीसीचा निर्णय हा उद्योगांवर मोठा अन्यायकारक आहे. त्यामुळे बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, विरोधी पक्षनेते आणि वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय जामदार यांनी सांगितले.
यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य अंबिरशाह शेख वकील, हरीश कुंभरकर, उद्योजक चंद्रकांत नलवडे, विजय झांबरे, संदीप जगताप, अनिल काळे, नितीन जामदार, आशिष पल्लोड, राजेंद्र पवार, अरुण चतुर, आप्पासाहेब जाधव, रावसाहेब पाटील, दीपक नवले, भूषण मोदी, एमएल शिंदे, सुधीर सूर्यवंशी, नितीन जाधव, संतोष कणसे आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसीच्या जीएसटी वसुली परिपत्रकाबाबत उद्योजकांच्या भावना तीव्र असून बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेले निवेदन तातडीने मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल अशी ग्वाही एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे यांनी शिष्टमंडळाला दिली.