जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढण्यात येणार असून दि. २० जानेवारी रोजी ही दिंडी मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा समाज पायी दिंडी काढून मुंबईत दाखल होणार आहे. दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आंतरवाली सराटी येथून ही दिंडी सुरू होईल. ही दिंडी आंतरवाली सराटीतून निघून शहागड, गेवराई, पाडळशिंगी, पाथर्डी, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपासमार्गे पुण्यातील शिवाजीनगरमध्ये पोहोचेल. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्ग, लोणावळा, पनवेल, वाशी चेंबूरमार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल.
या दिंडीदरम्यान, विविध भागातील मराठा बांधव या दिंडीत सहभागी होतील. पायी दिंडी ज्या गावातून जाईल त्या गावच्या परिसरातील नागरिकांनी त्या गावच्या ठिकाणी एकत्र येऊन तेथून पुढे प्रवास करावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. दरम्यान, ही दिंडी मुंबईतील आझाद मैदानात स्थिरावल्यानंतर त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.