छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन हाती घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिक खालावली असून त्यांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला आहे. तसेच त्यांच्यात अशक्तपणाही प्रचंड वाढला आहे. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
सलग नऊ दिवस अन्नपाण्याविना जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. त्याचा परिणाम त्यांचा प्रकृतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळीच त्यांच्या लिव्हर आणि किडनीवर सूज आल्याचं तपासणीत समोर आलं होतं. त्यानंतर दुपारपासून त्यांना उलट्यांचा त्रास झाला आहे. त्याचबरोबर सातत्याने चक्करही येत असल्यामुळे डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
आज सकाळी जरांगे पाटील यांना संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी तपासणीनंतर त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. या दरम्यान, त्यांचा अशक्तपणा वाढला असून चक्कर आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.