मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यु झाला आहे. त्यानंतर काल पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली. अजितदादांना शंभरच्या वर ताप असून प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे. सध्या अजितदादांवर घरीच उपचार सुरु आहेत. मात्र गरज पडल्यास त्यांना अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावं लागेल अशी माहिती डॉ. संजय कपोटे यांनी दिली आहे.
अजितदादांना पाच दिवसांपासून डेंग्युची लागण झाली आहे. त्यामुळे ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. काल त्यांची तपासणी केली असता त्यांना १०१ अंश सेल्सियस इतका ताप असल्याची माहिती डॉ. कपोटे यांनी दिली. डेंग्यूमुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला असून थोड्याफार हालचालीनंतरही त्यांना थकवा जाणवत आहे.
अजितदादांवर सध्या घरीच उपचार सुरु आहेत. घरातच आयसीयूप्रमाणे व्यवस्था करण्यात आली असून तिथेच सलाईन लावण्यात येत आहेत. डेंग्यू हा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये प्रचंड अशक्तपणा येत असतो. त्यातून बरे होण्यासाठी किमान एक महिना तरी लागतो.
सद्यस्थितीत अजितदादांच्या पेशींसह अवयवांची स्थिती कशी आहे याची तपासणी केली जाणार असून त्याचे अहवाल प्राप्त होताच रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.