
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील सातारा मुंबई महामार्गावरील असलेल्या नवले ब्रिजवर काल रात्री भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, भरधाव टँकरने तब्बल ४८ गाड्यांना धडक दिली. रात्री साडे आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये सुमारे ५० ते ६० जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल रात्री भरधाव टँकरने ४०० ते ५०० मीटर अंतरावरील तब्बल ४८ गाड्यांना धडक दिली. या गाड्यांमध्ये प्रामुख्याने कारचा समावेश आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. अपघात प्रचंड मोठा असल्याने परिसरात हाहाकार उडाला होता. ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच अग्निशमन दल, रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्य करण्यासाठी मदत केली. अपघात मोठा असल्याने बऱ्याच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.