मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करून गावठी कट्ट्याने त्यांना ठार मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत रामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्यामध्ये त्याने शरद पवार यांना देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार लक्षात घेत सिल्व्हर ओकवरील पोलिस ऑपरेटरने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम २९४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कालच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर ही धमकी आली असून पोलिस यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. धमकीच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे.