सातारा : प्रतिनिधी
वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने चर्चेत राहणारे बिगबॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीसह भाजपचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अभिजीत बिचकुले यांनी यापूर्वी विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवली आहे. बिग बॉसमधून ते घराघरात पोहोचले आहेत. आता त्यांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. सांगली, कोल्हापूर, मुंबई आणि पुण्यातील आमदार आपल्या संपर्कात असून अनुमोदन देण्यासाठी आवश्यक संख्या जुळताच आपण अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपसह महाविकास आघाडीतील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा अभिजीत बिचकुले यांनी केला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्राच्या मातीतील माणूस राष्ट्रपतीपदावर पोहोचू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच वेगवेगळ्या निमित्तानं चर्चेत राहणारे अभिजीत बिचकुले आता राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.