बारामती : प्रतिनिधी
विरोधकांकडून मतांसाठी धमकी दिल्याच्या होणाऱ्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. मी जर कोणाला धमकावलं असतं तर लोकांनी मला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठींबाच दिला नसता असं सांगत कुणाला जरा धमकावलं असेल तर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, पोलिस तपास याबाबतची कार्यवाही करतील अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे येथील सभेत केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. संस्था ही संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं असंही अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत विचारल्यानंतर अजितदादांनी तुम्हाला तरी असं वाटतं का असा प्रतिप्रश्न केला. एकवेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे असं म्हटलं असतं तर ते मान्य करता आलं असतं. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळं असं म्हणता येत नाही. लोकांना पटेल अशा पद्धतीची वक्तव्ये केली पाहिजेत असा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.
पुरंदरमध्ये आयोजित सभेबाबतही अजितदादांनी भूमिका मांडली. विजय शिवतारे यांनी आपल्या मागण्यांबाबत बैठकीत भूमिका मांडत त्यांच्या भागात सभा घ्यावी असं सांगितलं होतं. त्यानुसार गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यासह अन्य काही नेते या सभेला उपस्थित राहणार आहोत असं अजितदादांनी स्पष्ट केलं. आम्ही जे बोलतो तसं वागतो. आम्ही बदलत नाही; त्यामुळे या सभेला आम्ही सर्वजण जाणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं.