Site icon Aapli Baramati News

Big News : समीर वानखेडे जात पडताळणी समितीसमोर आज होणार हजर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी आजचा दिवस परीक्षा घेणारा आहे. त्यांना जात पडताळणी समितीकडून समन्स बजावण्यात आले असून ते आज या समितीसमोर हजर राहून जबाब नोंदवणार आहेत.

भीम आर्मीच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह अन्य संघटनांच्या तक्रारीवरुन समीर वानखेडे यांना समन्स बजावण्यात आले आहे.

भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्यासह दलित चळवळीतील कार्यकर्ते मनोज संसारे यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लीम असून त्यांनी शरियानुसार विवाह केला आहे. असे असताना त्यांनी आपल्या फायद्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.  दोन्ही तक्रारदारांचे वकील नितीन सातपुते यांनी जात पडताळणी समितीसमोर यासंबंधीची कागदपत्रेही सादर केली आहेत.

समीर वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्राची आणि बृहन्मुंबईच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या त्यांच्या जात प्रमाणपत्राची प्रत जात पडताळणी समितीकडे देण्यात आली आहे. त्यानुसार जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केली असून त्यांना आज दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात अटक केली होती.  तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरही वानखेडे यांनी कारवाई केली. त्यानंतर नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर शरसंधान साधत त्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दाही नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version