मुंबई : प्रतिनिधी
दोन आठवड्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विविध पर्याय देत संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने तोडगा निघत नव्हता. मात्र आज राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह संयुक्त पत्रकार घेत परिषदेत पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावर अद्याप निर्णय घेता येणार नाही. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. याबाबत न्यायालयाने समिती नेमली आहे. समिती अभ्यास करून निर्णय देईल. कर्मचाऱ्यांचे जे म्हणणे असेल ते समितीसमोर मांडावे, असा न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगत अनिल परब यांनी एसटी विलनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने समिती जो निर्णय घेईल, तो राज्य सरकारला मान्य करेल असे स्पष्ट केले. संपामुळे राज्यातील ग्रामीण जनतेचे मोठे हाल होत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ केली आहे. पहिल्या टप्प्यातील एसटी कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये पगार वाढ करत जवळपास त्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ केली. ज्या कर्मचाऱ्यांनी एक ते दहा वर्ष सेवा बजावली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ केली आहे.
दहा ते वीस वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चार हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक आठवड्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये होतील. त्यासोबतच निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.