मुंबई : प्रतिनिधी
आजपासून बेस्ट बस प्रवासासाठी तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असेल. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आता बेस्ट प्रशासनानं ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे आजपासून १४ दिवस आधी म्हणजेच १६ नोव्हेंबरपर्यंत लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांनाच बेस्टच्या बसनं प्रवास करता येणार आहे.
बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार बस कंडक्टर, ग्राऊंड स्टाफ आणि बस तिकीट तपासणाऱ्यांना प्रवाशांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अणि कंडक्टरलाही याचा त्रास होणार आहे. परंतु, विषाणूंमुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल.
‘मुंबईत अनेक ठिकाणी बस सुरु होण्याआधीच प्रवाशांना तिकिट दिले जाते. तिकिट देताना आजपासून लसीकरण प्रमाणपत्र पाहिले जाईल. सर्वांना कोविन अॅपवर लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. लसीकरण न केलेल्या प्रवाशांना ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांनाही ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.
खाजगी वाहक कंपनी मालकाकडून १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास त्यांच्याकडूनही १० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.