सातारा : प्रतिनिधी
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्याने विविध स्तरातून राज्य सरकारवर टीका होत आहे. सरकारच्या निर्णयावरून ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सातार्यात सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात साताऱ्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती संघाच्या वतीने ‘दंडवत दंडुका’ आंदोलन करण्यात आले. वाईन विक्रीला विरोध करताना बंडातात्या कराडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात, असा दावा केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुण लागल्यामुळे सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीर आंदोलन करणे, कोरोना नियमांचे पालन न करता आंदोलन करणे, मास्कबाबत वेगळी चिथावणी देणे या आरोपांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर भडकाऊ भाषण केल्याचीही सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.