बीड जिल्ह्यातील आष्टी मधील १० देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनीत घोटाळा;भाजपच्या आमदारांचा समावेश…
मुंबई : प्रतिनिधीबीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या… जमीनीही सोडल्या नाहीत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन त्यावर खासगी नाव चढवले. तसेच त्याचे प्लॉटिंग करुन हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमीन घोटाळा समोर आणला असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
यात वक्फ बोर्डाच्या चिंचपूर मस्जिद इनाम – ६० एकर, रुई नालकोल – बुहा देवस्थान – १०३ एकर, देवीनिमगाव – मस्जिद इनाम – ५० एकर अशा दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदू देवस्थानामधील मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची ४१ एकर ३२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान २९ एकर, कोयाळ येथील श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर रामचंद्रदेव देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकत विठोबा देवस्थान ५० एकर अशी हिंदू देवस्थानांची ३०० एकर जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. अशी एकूण ५१३ एकर जमीन खालसा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.