दौंड : प्रतिनिधी
पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने काल उमेदवार यादी जाहीर केली. दौंडमधून विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांना पुन्हा संधी देण्यात आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातून जिल्हा बँकेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत ‘मी कुठे कमी पडले..?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षा, महानंदच्या अध्यक्षा आणि आता महिला प्रदेश कार्यकारिणी अशा विविध पदांवर वैशाली नागवडे यांनी काम केले आहे. दौंडच्या राजकारणात सक्रिय असलेल्या वैशाली नागवडे यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र दौंड तालुक्यातून पुन्हा रमेश थोरात यांना संधी देण्यात आली आहे.
यापूर्वीही वैशाली नागवडे या दौंडमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र त्यावेळी रमेश थोरात यांना संधी देण्यात आली. आताही जिल्हा बँकेत थोरात यांचीच वर्णी लागली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या वैशाली नागवडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
वैशाली नागवडे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटच्या सहकारी आहेत. त्यांना जिल्हा बँकेत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या फेसबुक पोस्टवर विविध प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.