
मुंबई : प्रतिनिधी
आता किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटपेक्षा मोठे आहे. तेथे स्टॉल टाकून वाईन विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी याकरिता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले, हा प्रस्ताव दहा वर्षापूर्वीचा होता. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वाईनरी आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर वाईन व्यवसाय चालतो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त जागा असणाऱ्या सुपर मार्केटमध्ये स्टॉल टाकून वाईन विक्री करता येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
हिमाचल प्रदेश आणि गोवा राज्यात भाजपाने हेच धोरण अवलंबले आहे. सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाने वाईन विक्रीचे धोरण अवलंबले आहे. परंतु येथे भाजपाकडून विरोध केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.