कात्रज : प्रतिनिधी
‘पुणे तेथे काय उणे’ अशी म्हण आहे.. स्वागत असो किंवा निषेध व्यक्त करणे असो पुणेकर कसे फलक लावून व्यक्त होतील त्याचा काही कोणाला अंदाज नाही. शहरातून असेच एक वृत्त समोर आले आहे. कात्रज चौकात नुकतेच उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाले आहे. त्याच चौकात काही अज्ञात व्यक्तींनी ‘कात्रजचा खून झाला’ असे भले मोठे बॅनर्स लावले आहेत. उड्डाणपुलाच्या भूमीपूजनाचा निषेध नोंदवण्यासाठी हे बॅनर्स लावण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
शहरातील कात्रज चौकात मोकळ्या जागेत हे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी लावले होते. ही घटना महापालिकेला समजल्यानंतर हे बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. मात्र या आगळ्यावेगळ्या बॅनरची शहरात याची जोरदार चर्चा चालू आहे. निषेध व्यक्त करण्यासाठीच हे बॅनर्स लावण्यात आले असावे, असाच प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
नुकतेच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज चौकात उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या उड्डणपुलामुळे स्थानिक लोकांचे व्यवसाय बंद पडतील की अशी शंका आहे. त्याचसोबत बॅनर्स खाजगी जागेत लावण्यात आले होते. त्यामुळे खाजगी जागा भूसंपादनासाठी जाणार काय ? अशीही शंका उपस्थित होत आहे.