नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व लाभ मिळावेत अशी मागणी करतानाच राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण करावे ही कर्मचाऱ्यांची मागणी अवास्तव असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी या संपाला पाठिंबा जाहीर केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण करण्याची मागणी होत आहे. ही मागणी अवास्तव असल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण केल्यास इतर महामंडळातील कर्मचारीही ही मागणी लावून धरतील. त्यामुळे महामंडळ जैसे थे ठेवून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गेल्या काही दिवसांपासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. त्यामुळे राज्यातील बससेवा पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळाचे विलणीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.