मुंबई : प्रतिनिधी
एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ अखेरपर्यंत राज्याच्या विविध विभागात रिक्तपदांची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात लवकरच ७ हजार ५०० पदांची भरती करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
महाराष्ट्रात ‘एमपीएससी’ कडून अ, ब, आणि क अशा तीन विविध विभागात ही रक्त पदे भरण्यात येणार आहेत. ‘एमपीएससी’कडे आतापर्यंत २५ विभागांमधील रिक्तपदांची संख्या मिळाली आहे. त्यानुसार सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन गटांमध्ये रिक्त पदे शिल्लक आहेत. त्यानुसार ‘अ’ गटामध्ये १४९९ पदे, ‘ब’ गटामध्ये १२४५ पदे आणि ‘क’ गटामध्ये १५८३ पदे अशा एकूण ७ हजार ५०० पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची संपुर्ण माहिती ‘एमपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे, नोकरभरतीचा वेग कमी झाला आहे. आयोगाने लवकरात लवकर जाहिरात आणि वेळापत्रक प्रसिद्ध करून नोकरभरतीला सुरुवात करावी, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.