
मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शालेय विभागाने ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयानंतर राज्यातील अनेक पालकांकडून आणि संघटनांकडून शाळा सुरु राहाव्यात, अशी मागणी होत होती. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा ऑफलाइन पद्धतीने चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, अनेक शिक्षणतज्ञ , पालक व संघटनांकडून शाळा ऑफलाईन पध्दतीने चालू करण्याची विनंती करण्यात येत होती. या काळात शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनतर शाळा चालू करण्यासंदर्भातचा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मजुरी देण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी असेल, अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना शाळा चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियमावली पाळत शाळा सुरू होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील शाळा २० दिवसानंतर पुन्हा सुरू होत असल्यामुळे पाल्य आणि पालकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.