मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने उमेदवार मागे घेण्याची भाजपाकडे केलेली विनंती त्यांनी स्वीकारली आहे. राज्यसभेची होत असलेल्या निवडणुकीमधून भाजपने माघार घेतली आहे. भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी आज राज्यसभेच्या निवडणुकीत मधून उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाली असून केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे.
काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेचा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस आग्रही होते. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. वरिष्ठांशी सल्लामसलत करून तुम्हाला निर्णय कळवतो असे फडणवीस यांनी सांगितले होते.
दरम्यान, काँग्रेसच्या या विनंतीचा स्वीकार करत भाजप राज्यसभा निवडणुकीतून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या रजनी पाटील राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पटोले यांनी आम्हीही तुम्हाला अशा प्रकारची गरज पडल्यास नक्कीच मदत करू अशा शब्द चर्चेदरम्यान फडणवीसांना दिला होता. त्यामुळे काँग्रेस भाजपला काय देणार? किंवा भाजपा काँग्रेसकडून काय घेणार ? या प्रश्नांना राजकीय वर्तुळात तोंड फुटले आहे.