पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णदर एक टक्क्यांपेक्षा कमी असल्यास शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही होकार दर्शवल्याची माहितीही त्यांनी दिली.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोनासंदर्भात आढावा घेतला. शहरातील सद्यस्थिती, बाजारपेठेची स्थिती आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. तत्पूर्वी पुणे मेट्रोच्या कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना पॉझिटिव्हिटी रेट जिथे कमी आहे, तिथे निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासनाकडून निर्बंध शिथिल झाले, तरीदेखील मास्क, सॅनिटायझर वापरासह गर्दीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असून सर्व ती खबरदारी घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात सध्या दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे आता शासनाच्या नव्या नियमावलीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा मिळू शकते.