Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नाही; काही दिवस विश्रांती घेणार, अजितदादांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..!

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

अजितदादांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा; आजारपणामुळे जनतेपासून दूर रहावे लागणे त्रासदायक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून डेंग्युमुळे आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी पुढील काही दिवस विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीत जनतेला भेटता येणार नसल्याचं सांगत अजितदादांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजारपणामुळे जनतेपासून दूर रहावं लागत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version