बारामती : प्रतिनिधी
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची तयारी, ग्रामपंचायतींचे निकाल यामुळे राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ह्या केवळ अफवा असून कोणत्याही धमकीचा फोन आला नसल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजल्यानंतर राजकीय क्षेत्रासह माध्यम आणि पोलिस यंत्रणांचीही तारांबळ उडाली होती.
आज शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमाला शरद पवार यांनी येऊ नये अशा स्वरूपाचा धमकीचा फोन आल्याची चर्चा होत होती. याबाबत काही माध्यमांमध्ये बातम्याही झाल्या. मात्र अशा धमकीचा फोन आपल्याला आलाच नाही. तसेच धमकीच्या सुरू असलेल्या चर्चांबाबत आपल्याला कल्पनाही नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे या बातमीनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांसह शरद पवार यांच्या कार्यालयाकडून या धमकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नेमके काय घडले आहे याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. शेवटी स्वत: शरद पवार यांनीच आपल्याला असा काही फोन आलेला नसल्याचे स्पष्ट करत धमकीच्या चर्चांना विराम दिला.
दरम्यान, कुर्डूवाडी दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी देश आणि राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केले. सध्या दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार याबाबत चर्चा सुरू असताना मुंबईतील शिवाजी पार्क आणि शिवसेना हे समीकरण आहे. त्यामुळे दसरा मेळावा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी मिळाली पाहिजे असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.