नांदेड : प्रतिनिधी
सातत्याने सकाळी ७ वाजल्यापासून जनतेसाठी कार्यरत राहणारे अजितदादा कौटुंबिक सहलीसाठी गेले तर माध्यमात लगेच बातम्या येतात. सतत कार्यरत राहणाऱ्या व्यक्तीने काही दिवस सुट्टी घेतली तर त्यात गैर काय असा सवाल करत अजितदादांच्या अनुपस्थितीच्या बातम्या येतात हा माझ्या भावावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून अजितदादा कुठेही दिसत नाहीत याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना विराम दिला.
नियमीतपणे सकाळी ७ वाजल्यापासून कार्यरत असणारे अजितदादा सध्या ‘पर्सनल हॉलिडे’ वर आहेत. ते कुठे आहेत हे तुम्हाला सांगू का अशी विचारणा करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादी व्यक्ती सातत्याने कार्यरत असते आणि ते कौटुंबिक सहलीसाठी चार-पाच दिवस गेले तर गैर काय आहे. मात्र यावर लगेच उलटसुलट बातम्या येतात हा माझ्या भावावर अन्याय आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार कोणत्याही जाहीर कार्यक्रमात किंवा माध्यमासमोर आलेले नाहीत. त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या येत आहेत. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना या चर्चांना विराम दिला आहे. K