बारामती : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्याकडे वेळ मागितला म्हणून आम्ही ४० दिवसांची मुदत दिली. येत्या २४ तारखेला ही मुदत संपणार आहे. तत्पूर्वी २२ ऑक्टोबर रोजी आपण या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी मी माझ्या समाजाशी प्रामाणिक असून आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असेही जरांगे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
बारामतीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय मुदतीपूर्वी घ्या अशी आग्रही मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत कायदा पारित केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा अडचणी येवू नयेत यासाठी आम्ही सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. आता सरकारने २४ तारखेला आदेश पारीत करून आरक्षण द्यावं. अन्यथा आम्ही तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
मी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सरकारला मराठा आरक्षण निर्णयापर्यंत आणलं आहे. परंतु २४ ऑक्टोबरनंतर हे शांततेचं युद्ध सरकारला झेपणार नाही आणि पेलणारही नाही असं सांगून जरांगे पाटील म्हणाले, आता मराठा समाजाने ताकदीने तयारी करा, गाफील राहू नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराजांचा एकही मावळा गाफील राहत नव्हता. त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करा.