
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर अकलूजमध्ये जुळ्या बहीणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. सोशल मिडियात तर या जोडप्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अशातच आता या दोन जुळ्या बहीणींशी लग्न करणारा युवक भलताच ‘बहाद्दर’ असल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्वी एक लग्न झालेले असताना त्याने या दोघींशी विवाह केल्याची बाब समोर आली असून याबद्दल चौकशीचे आदेश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या लग्नात नवीन ट्विस्ट आला आहे.
काही दिवसांपूर्वी अकलूजमध्ये एक विवाह सोहळा पार पडला. दोन जुळ्या बहीणींनी एकाच मुलाशी विवाह केला. त्यामुळे या लग्नाची राज्यभरात चर्चा सुरू झाली. अशातच कायद्याला धरून नसलेल्या या लग्नाच्या विरोधात तक्रारीही झाल्या. मात्र आता या नवरदेवाबद्दल एक नवीनच भानगड समोर आली आहे. दोन जुळ्या बहीणींसोबत संसाराची स्वप्ने पाहणारा अतुल अवताडे यांचे आधीच एक लग्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोघींनी अतुल अवताडे याच्याशी विवाह केला. या विवाहाची राज्यभर चर्चा झाली. अतुल हा मुंबईत ट्रॅव्हलिंग व्यवसाय करत असून तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे या पूर्वी एक लग्न झाले असताना त्याने या जुळ्या बहीणींशी लग्न केल्याची तक्रार त्याच्या पहिल्या पत्नीने केली आहे. तिने महिला आयोगाकडे याबाबत धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.