मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. १५ जूनपासून राज्यातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. १३ जून रोजी केवळ पहिलीच्या वर्गासाठी ‘पहिलं पाऊल’ हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शाळांबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले होते. राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध लागू झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिलीच्या वर्गासाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम १३ जून रोजी राबवला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभाग आणि चाइल्ड टास्क फोर्सशी चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून त्याची तारीखही जाहीर केली जाईल असेही वर्षा गायकवाड यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.