Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ निवासस्थानी तीन महिन्यात जेवणासाठी २ कोटी ३८ लाखांचा खर्च; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

आपल्या भाषणात आमचे सरकार हे सामान्यांचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच सांगतात. मात्र सत्तेत आल्यापासून जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ३ महिन्यात जेवणावर तब्बल २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२२ या १२३ दिवसांच्या कालावधीत खानपान सेवेसाठी २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी जेवणावर दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च होत असल्याची बाब समोर आली आहे.

दुसरीकडे ‘सहयाद्री’ अतिथिगृहातील चहा, कॉफी आणि नाश्त्यासाठी ८ दिवसांमध्ये ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या बैठका आणि त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी चहा, कॉफी, थंडपेय यासाठी ३ लाख ४९ हजार ९२९ रुपये खर्च केल्याची माहिती देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून ७ महिन्यात तब्बल ४२ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केल्याची माहिती नितीन यादव यांनी मिळवली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जेवणावळींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे समोर आले आहे.

सामान्य जनतेचं सरकार असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्ष कृतीत ते आणलं जात नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या वारेमाप खर्चायला लगाम लावून खऱ्या अर्थाने सामान्य जनतेसाठी काम करावं अशी अपेक्षा नितीन यादव यांनी व्यक्त केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version