मुंबई : प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीला अवघे काही दिवस उरलेले असताना एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या आठ ते दहा दिवसात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही ठरला असून त्यामध्ये भाजपला चार कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे, तर शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात एकानाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जात होते. मात्र मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देत आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. त्यानंतरही मंत्रीमंडळ विस्ताराचं घोंगडं भिजत पडल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रीमंडळात भाजपच्या चारजणांना कॅबिनेट, तर दोघांना राज्यमंत्रीपद आणि शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचेही बोलले जात आहे. आता यात कोणाला संधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा येईल असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
मंत्रीमंडळात स्थान न मिळणाऱ्या आमदारांना महामंडळांवर संधी देण्याबाबतही भाजप-शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा वादळ निर्माण होणार का याकडेही लक्ष लागले आहे.