
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून शिवसेना संजय राऊत यांच्या घरी चौकशी करण्यात आली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मी गुडघ्यांवर फरफटत जाणारा नसून निधड्या छातीने ईडीच्या कारवाईला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
आज सकाळी साडेसात वाजता ईडीच्या तब्बल १० अधिकाऱ्यांच्या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन चौकशीला सुरुवात केली. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून संजय राऊत यांना ईडीने दोनवेळा समन्स बजावले होते. मात्र आपण संसदेच्या अधिवेशनानंतर चौकशीसाठी येणार असल्याचे संजय राऊत यांनी ईडीला कळवले होते.
आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन चौकशीला सुरुवात केली. तब्बल साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या रडारवर होते. याबाबत संजय राऊत यांनीही अनेकदा संकेत दिले होते. आज अखेर त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरफटत जात नाही.. निधड्या छातीनं उभा राहतो आणि लढतो.. कुणी काहीही म्हणू द्या.. ईडीच्या कारवाईलाही मी निधड्या छातीने सामोरे जातोय.. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.. असे सांगत राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.