मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या सर्व घटनेनंतर मला कॉँग्रेस नेत्यांसह शरद पवार यांनी आम्ही पाठीशी असल्याचं सांगितलं. मात्र आमच्याच लोकांनी असं वागणं हे माझ्यासाठी दु:खदायक आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही माझ्याजवळ बोलू शकत होता. सुरतला जाण्याची काय गरज होती असा सवाल करत तुम्ही म्हणत असाल तर मी मुख्यमंत्रीपदासह पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या स्थापनेपासून कोरोना काळातील कामकाजाचा आढावा घेतला. शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडले नाही. मात्र काहीजण नाहक त्यावर चर्चा करत असल्याचं सांगताना त्यांनी मागील आठवड्यातील आयोध्या दौऱ्याचा संदर्भ दिला.
मागील दोन दिवसांत शिवसेनेतील बंडाविषयी बातम्या येत आहेत. पण या सर्व गोष्टी माझ्यासमोर येवून सांगायला हव्या. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नकोत तर मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. इतकंच काय तर पक्षप्रमुख पदाचाही त्याग करायला मी तयार असल्याचे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.