आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG BREAKING : उद्या मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता; राज्याला मंत्रीमंडळ मिळणार..?

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल ३८ दिवस उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्यानं टीका होत होती. मात्र आता उद्या सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारानंतर लगेच पावसाळी अधिवेशन घेण्याची तयारीही करण्यात आल्याची माहिती समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन तब्बल ३८ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र आजवर राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा दिल्ली दौरेही केले. मात्र विस्तार नेमका कधी होणार याबाबत प्रश्नचिन्हच होते.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात हालचाली सुरू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपकडून आठ आणि शिंदे गटाकडून सात असे एकूण १५ मंत्री शपथ घेतील अशी माहिती मिळत आहे.

मंत्रीमंडळावर चर्चा नाही; पण लवकरच विस्तार : रामदास कदम  

दरम्यान,  मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेल्या रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र येत्या एक-दोन दिवसात विस्तार होऊ शकतो असे त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण मंत्रीमंडळात किंवा विधानपरिषदेवर नसू असेही त्यांनी यावेळी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us