
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. केवळ पोलिसांमधील अंतर्गत वादांमुळे हा हल्ला रोखण्यात अपयश आल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांमधील गटबाजीवर विशेष लक्ष देण्यात आले असून काही अधिकारी रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याच दरम्यान, दगड आणि चप्पल फेक करत आंदोलकांनी पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाही केला. या प्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शंभरहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली.
या प्रकरणातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता या हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती. मात्र केवळ अंतर्गत वादामुळे हा हल्ला रोखण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे आता आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या अंतर्गत गटबाजीवर आता सरकारकडून विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्यातही काही अधिकारी सरकारच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.