बारामती : प्रतिनिधी
बारामती आणि इतरत्र वेडेवाकडे प्रकार मी खपवून घेणार नाही. काल परवा पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गॅंगने गोंधळ घातला. मला अशा गोष्टी अजिबात चालणार नाही. माझ्या जवळ बसणारा चुकीचा असेल तरी त्याच्यावर कारवाई करा अशा सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त बारामतीत आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिस यंत्रणेला कडक शब्दांत सूचना दिल्या. बारामतीत काही वेडेवाकडे प्रकार घडत आहेत. हे मी अजिबात खपवून घेणार नाही. कुणाचीही दहशत चालणार नाही असे सांगतानाच माझ्या जवळचा कार्यकर्ता चुकला तरीही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
काल-परवा पिंपरी चिंचवडमध्ये काहीजण एका हॉटेलमध्ये गेले. पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून त्या ठिकाणी कोयत्याने तोडफोड केली. याबाबत मी पिंपरीच्या आयुक्तांसह पुण्याचे आयुक्त आणि ग्रामीण पोलिसांनाही बोलेन. मी या गोष्टी अजिबात खपवून घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, बारामतीतील काही हॉटेलमध्ये वेडेवाकडे प्रकार होत आहेत. मला हे चालणार नाही. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवावं. बारामतीत सर्वांना सुरक्षित वाटलं पाहिजे याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता पोलिस यंत्रणेकडून अजितदादांच्या सुचनांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.