नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे देशातील सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला असताना एक महत्वाची बातमी समोर येत आहे. यूपीएकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अनुमोदन दिल्याचे वृत्त येत आहे. एका वरिष्ठ कॉँग्रेस नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येवून निवडणुका लढवण्याबद्दल भूमिका मांडली आहे. त्या अनुषंगाने ते सातत्याने विरोधी पक्षांच्या प्रमुखांशी चर्चाही करत आहेत. विशेष म्हणजे कॉँग्रेसला वगळून ही निवडणूक लढवायची नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
यूपीएकडून शरद पवार यांच्या नावावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्याचे संकेत मिळत आहेत. कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्या नावाला अनुमोदन दिल्याची माहिती एका वरिष्ठ कॉँग्रेस नेत्याकडून मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर देशातही अशाच स्वरूपाची आघाडी निर्माण व्हावी, अशी सोनिया गांधी यांची मानसिकता आहे.
देशातील सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत आव्हान देणे सोपे होणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला असून आता त्यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून संधी देण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याबाबत लवकरच सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक होणार असल्याचेही संबंधित कॉँग्रेस नेत्याकडून सांगण्यात आले आहे.