मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकासकामांना स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामांना स्थगिती न देण्याची आणि अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वितरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. निधी थांबवून स्थानिक जनतेवर अन्याय केला जात असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही करून संबंधित कामे पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश द्यावेत अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीबाबतही यावेळी मागणी करण्यात आली. ज्या संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या निवडणुका स्थगित करू नयेत त्यांची प्रक्रिया पूर्ण होवू द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.