Site icon Aapli Baramati News

Big Breaking : राज्यात अद्याप मास्क सक्ती नाही; पण तरीही दक्षता गरजेची : आरोग्यमंत्री राजेश टोपे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

‘राज्य सरकार सध्याच्या कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आलेले नाही. मास्क न वापरल्यास नागरिकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही. असे असले तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे. 

महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्यापासून कोरोनाचे निर्बंध शिथिल केले होते. मात्र सद्यस्थितीत देशात कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सिनेमागृहे, सभागृहे आणि कार्यालये यांसारख्या बंद जागांवर लोकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. ‘आम्हाला पुन्हा निर्बंध नको असतील, तर स्वयं-शिस्त पाळावी लागेल, मास्कचा वापर आणि लसीकरण अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

एकीकडे तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांनी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्याचे पालन न केल्याबद्दल दंडही ठोठावला जात आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप मास्क सक्ती केली नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार चाचणी आणि लसीकरणाची गती वाढवून विषाणू आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या सादरीकरणात मर्यादित ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात यावे असे सुचवले आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी नागरिकांना बंद ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version