Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; उपोषणामुळे प्रकृती खालावली, किडनी आणि लिव्हरवर आली सूज

ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी काल आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर आता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलग नऊ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या किडनीसह लिव्हरवर सूज आली असून पुढील काही दिवस उपचार करावे लागतील, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात करताना अन्नत्याग सुरू केला होता. या काळात त्यांनी कोणतेही औषधोपचार न घेता उपोषण सुरू केले होते. विशेष म्हणजे त्यांनी पाण्याचा थेंबही न घेण्याची भूमिका घेतली होती. अखेर नवव्या दिवशी म्हणजेच दि. २ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांनी माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले.

सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या उपोषणावेळी त्यांनी नियमीत उपचार घेतले होते. मात्र यावेळी उपचार नाकारण्यासह पाणीही टाळल्यामुळे त्यांना अधिकचा त्रास झाला. यावेळी त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याचेही तपासणीत समोर आले आहे.

रक्तदाबही कमी झाला असून वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सर्व तपासण्या करून उपचारांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती पाहता पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच मुक्काम करावा लागणार आहे. त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती लक्षात घेऊन रुग्णालयाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version