मुंबई : प्रतिनिधी
लोकशाही ही मराठी वृत्तवाहिनी पुढील ७२ तास बंद राहणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केलेल्या सुचनेमुळे हे प्रक्षेपण बंद ठेवले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील हावभावांची चित्रफीत प्रसारीत केल्याच्या प्रकरणामुळे लोकशाही वृत्तवाहिनीला प्रक्षेपण बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अचानकपणे माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही सूचना केल्यामुळे माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी लोकशाही वृत्तवाहिनीने माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्लील हावभाव असणारी चित्रफीत प्रसारीत केली होती. त्यावर किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता थेट वृत्तवाहिनीचे प्रसारण ७२ तासांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून मिळाल्याची माहिती संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे.
आज सायंकाळी ही सूचना आल्यानंतर तात्काळ वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. वास्तविक या प्रकरणात वृत्तवाहिनीची बाजू जाणून घेणे आवश्यक होते. परंतू तसे न करता थेट प्रक्षेपण बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही कमलेश सुतार यांनी म्हटले आहे. संबंधित बातमी प्रसारीत झाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नोटीसही लोकशाही वृत्तवाहिनीला देण्यात आले होते. त्यानुसार वृत्तवाहिनीकडून आपली बाजूही मांडण्यात आली होती. परंतु आज अचानक ७२ तास वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद ठेवण्याच्या सूचना आल्या आहेत.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. असं असताना आमची बाजू जाणून न घेता आम्हाला शिक्षा देण्याचा हा प्रकार असल्याचं कमलेश सुतार यांनी सांगितलं. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील प्रक्रिया राबवणार असल्याचंही कमलेश सुतार यांनी स्पष्ट केलं. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून आम्ही पुन्हा निर्भीडपणे प्रेक्षकांसमोर जाऊ असंही कमलेश सुतार यांनी म्हटलं आहे.